रॅम्पेज
- आकाश खोत "साहेब... ते माझा रूट बदलायचं बघा की. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या. करा की एवढं काम." निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते. "बघू म्हटलं नाय का रे तुला? कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय? आता याद्या निघतील काही दिवसांत, तेव्हा बघू ना." "अहो साहेब, याद्या आलरेडी ठरल्यात, म्हणून कानावर आलं माझ्या. आपल्याला हवं ते करून घेतलंय सगळ्यांनी. मग माझंपण काम करा ना त्यात." "कोणी सांगितलं तुला? अजून मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे, कोण नाही... कुठल्यातरी बाजारगप्पा ऐकून माझं डोकं नको खाऊ. चल नीघ आता. कामं आहेत खूप." निरकर हिरमोड होऊन निघाला. निरकर एसटीचा ड्राइवर होता. गेले बरेच दिवस त्याला दूरच्या रूटवर नेमलेला होता. आणि बरेच दिवस त्याची अशीच लांब लांब पल्ल्याच्या मार्गावरच नेमणूक होत होती. म्हणून तो कंटाळलेला होता. अशा सततच्या प्रवासाने त्याला पाठदुखी सुरू झाली होती. महिन्यातला अर्ध्याहून अधिक वेळ त्याचा...