Posts

परत एकदा पहिल्यासारखे, होणे नाही, होणे नाही...

संदर्भहीन आनंदाच्या तहानेत निष्फळ अंतहीन वणवण परिचित प्रदेशांच्या चकव्यात तेच सुतक पुन्हापुन्हा, पुन्हापुन्हा तेच सण आपण सध्या जगतोय, ते विकत की फुकट? एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीसाठी सहन करतात माणसं आपला चिडचिडाट आणि व्हायसा व्हर्सा? रोज उठून थोबाडावर प्लॅस्टिकचं स्मायली ताणून बसवतो आपण, ते नक्की कुठल्या अन्ब्रेकेबल रबरबॅण्डनी? असले आचरट प्रश्न पाडून कपाळावर किमान साडेचार आठ्या बसवलेल्या तिच्याकडे, निदान दिवसाच्या अखेरीला तरी कुणी शहाणा माणूस दोन गोड शब्दांच्या अपेक्षेनं यायचा नाही, इतपत व्यवस्था दिवसभरानं करून ठेवलेली. ती नखभर कारटी गात टीव्हीवर जीव तोडून, त्यावरही जळजळीत ऍसिडिक प्रतिक्रियांची आतषबाजी चालू असे तिची. चेहरा अर्थात हसराच. पण ’आयुष्यावर हसणे थुंकून देतो...’मधलं कडूजहर हसणं. काय बिशाद कुणी जवळ येऊ धजेल. अशात त्या दिवशी टीव्हीसमोर लोळून समोर गळणार्‍या कशावर तरी काहीतरी फूत्कारताना, तिच्या रूममेटनं तिच्या कपाळावर तळवा ठेवला फक्त. त्यावर काहीतरी धारदार बोलण्याआधी तिचे डोळे आपसूक मिटले आणि तिसर्‍या सेकंदाच्या आत तिचं विमान उडालं. निळी स्वप्नील झोप. जिवंत माणसाचा स्पर्श, माणसाला ...