Posts

फिर पुकारो मुझें... फिर मेरा नाम लो...

दोन आठवड्यांपूर्वी मी पेडर रोडवरच्या रशियन कॉन्स्युलेटजवळ असलेल्या कॉलेज लेनमधे गेले होते. काहीशी अचानक. आणि काल न राहवून पुन्हा गेले. मुद्दाम. रशियन कॉन्स्युलेटबाहेरच्या बसस्टॉपला अगदी लागूनच ती लेन आहे. पेडर रोडवरच्या वर्दळीपासून आणि एकदंरीतच झगमगाटापासून ती अख्खी गल्ली इतकी अलिप्त कशी राहू शकलीय याचं आश्चर्य वाटण्याइतकी नि:स्तब्धता तिथे भर दिवसाही असते. गल्ली निरुंद आहे. दोन्ही बाजूंना जुनी, विस्तारलेल्या - वेड्यावाकड्या खोडांची, तर काही नंतर सुशोभीकरणासाठी मुद्दाम लावलेली सुबक गुळगुळीत झाडं आहेत. गल्लीत शिरून पायी चालताना खाली सोफिया कॉलेजपर्यंत गेलेल्या कोप-यावरून वळलेल्या रस्त्यावरची दाट शांतता लोटालोटाने वर सरकत थेट तुमच्यापर्यंत येऊन पोचत राहते. तुझ्या लक्षात राहील अशी फेअरवेल पार्टी देतो तुला, असं ऑफ़िसमधल्या जुन्या मित्राने मला त्या दोन आठवड्यांपूर्वी कधीतरी कबूल केलेलं. मी (एकदाची) चालले, अशा खुशीत तो जरा जास्तच होता बहुधा. त्यामुळे नुसतं ’नेतो’ इतकंच म्हणून तो थांबला नव्हता, तर आदल्याच दिवशी इतर सगळ्यांची मिळून JBTBमधे जोरदार पार्टी झाल्यावरही दुस-या दिवशी लक्षात ठेवून ऑफीसम...