Posts

’सुट्टी सुरू!!’ आणि ’तेल-वेणी’

सुट्टी सुरू!! रंगपंचमीनंतर मला कोल्हापूरचे वेध लागायचे. मग वार्षिक परीक्षा झाली की, आई किंवा बाबा मला कोल्हा्पूरला सोडायला यायचे. आईबरोबर एस.टी.ने जाणे म्हणजे अवघड परीक्षा असे. कारण कात्रज यायच्या आतच आई ’आ’ वासून झोपून जाई. बरं, तिच्या झोपण्यातसुद्धा भारी निग्रह असे. कितीही हलवलं, भुण-भुण केली, चिमटे काढले, तिचे डोळे हाताने उघडायचा प्रयत्न केला तरी ती ठामपणे झोपून राही. मग पहिला अर्धा तास लोकाना तिची दया येत असे. पण नंतरचे पाच तास मात्र माझी कीव येत असे. क-हाडच्या आसपास आई खडबडून जागी होई. मग आपण अजून दीड तास झोपू शकतो या जाणिवेने ती माझ्याशी थोडा वेळ बोलायचा प्रयत्न करीत असे. पण एकूण आईबरोबर जाणे आणि एकटे जाणे यांत फारसा फरक नसे. बाबाबरोबर पुणे-कोल्हापूर प्रवास म्हणजे खूप मजा. कारण स्वारगेटवर जरी "बाबा,पॉप्पिन्स" असं म्हटलं तरी लगेच मिळत असे. बस-स्टॅन्डवर बाबा जगातली सगळी वर्तमानपत्रं विकत घेत असे. मग बसमध्ये चढल्यावर बाबा मला माझ्या तिकिटाचे पैसे काढून देत असे. कंडक्टरकडून तिकीट काढून घेईपर्यंत मी शांत असे. मग एकदा का बस निघाली की, जेमतेम कात्रजपर्यंत माझा गुणी शांतपणा टिक...