बेचव काळ्या भुंग्याची गोष्ट आणि “उंदरा, कुठंयस तू?!”
बेचव काळ्या भुंग्याची गोष्ट बाहेर ऊन रणरणत होतं आणि काळं-हिरवं मांजर ध्यानस्थ बसलं होतं. बेबलॉश्की कोपऱ्यात कुठल्याशा काळ्या डब्याशी चाळा करत बसला होता. अशा शांत वातावरणात नेहमीच होतं त्याप्रमाणे एक वादळ “गुण-गुण” करत मांजराच्या नाकाभोवती घोंघावू लागलं. मांजराने चमकून डोळे उघडले, तर एक मोठ्ठा भुंगा त्याच्या समोर आला. मांजराने तत्परतेने भुंग्याला एक सणसणीत पंजा मारला, पण भुंगा बचावला आणि त्वेषाने गुणगुणू लागला. त्यात भर म्हणून बेबलॉश्की मोठ-मोठ्याने ही-ही करत हसायला लागला. हे पाहून मांजर इरेला पेटलं आणि त्यानं भुंग्याला पंजा मार, त्याच्यावर उडी मार असं काहीबाही करण्याचा सपाटाच लावला. मग थोडा वेळ खूपच गोंधळाचं वातावरण तयार झालं. भुंगा मांजराला न जुमानता ऐटीत उंडारत होता, त्यात बेबलॉश्कीने जोरजोरात काळा डब्बा उडवत त्या दोघांभोवती विचित्र आदिवासी नाच करायला सुरुवात केली. मांजर मग जास्तच चेकाळलं आणि त्यानं भुंग्यावर एक जोरदार हल्ला चढवला. भुंगा भेलकांडत खाली येऊन पडला आणि मांजराने त्वरित झडप घालून त्याला तोंडात कोंबलं. पण दुसऱ्याच क्षणी त्यानं भुंग्याला बाहेर ओकून टाकलं, कारण भुंगा भलताच बे...