एका गारुड्याची गोष्ट : साप पकडणे!

- जॅक डनियल्स

...मला घरी फोन यायचा "अहो ते सापवाले आहेत का? आमच्या घरी /बागेत /रस्त्यावर /गच्चीवर /स्वयंपाकघरात इ. भला मोठा साप आहे, तुम्ही ताबडतोब या.", ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोनमध्ये लावायचो. एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे? मी पोहचेपर्यंत कोणालापण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा. आत्ता सांगा पत्ता ?"( भाग पहिला)
पत्ता घेऊन मी तडक सुटायचो आणि सापापर्यंत तडक पोहोचायचो.( वाचा: भाग पहिला म्हणजे हे "तडक" प्रकरण समजेल ;)) साप पकडायचा म्हणजे तो पहिल्यांदा दिसला पाहिजे, पण तेच अवघड असायचे. आपल्याकडे सापाविषयी जेवढी भीती आहे, तेवढीच उत्सुकतापण आहे. त्यामुळे एखाद्या घरात साप निघाला तर; त्या घरचे लोक, त्यांचे नातेवाईक, रस्त्यावरून जाणारे लोक, बाजूच्या सोसायटीमधले लोक, मुलांच्या मित्र-मैत्रिणी असे सगळे त्या ठिकाणी पिच्चरचे शूटिंग असल्यासारखे जमतात. या गर्दीत मी माझी गाडी घालायचो (घोडा युद्धात घालतात तसा, कारण पुण्यात लोक नुसत्या हॉर्नने बाजूला होत नाहीत!)
माझ्याकडे बघून लोकांचे हजार प्रश्न:
काका (वय ४०) : तुम्ही नक्की साप पकडता का? म्हणजे तुम्ही तसे दाढी-मिशीवाले दिसत नाही, म्हणून विचारले.
हेहेहे!
काकू (वय:?) : तुमचा चेहरा ओळखीचा वाटतो, बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचे खाते आहे का?

पोरगा (एस.पी. ते पुणे विद्यार्थी गृह इ.) : तो ऑस्टिन स्टीवन डिस्कवरीमध्ये वापरतो तसा 'स्नेक टाँग' (tong) आहे का तुमच्याकडे?

सुबक ठेंगणी (बृहन्महाराष्ट्र ते सिंहगड इ.) : तुमची डिस्कवरीची कॅमेरा टीम कुठे आहे?


अशा प्रश्नातुर लोकांमधून मी 'ज्याच्या घरात साप निघाला आहे किंवा ज्याने साप पहिला आहे' असा योग्य तो माणूस शोधून काढायचो. जेव्हा कॉल करणे सुरू केले, तेव्हा ही पहिली पायरीपण खूप अवघड होती. हरचन पालवाच्या कपाटाची दुरुस्ती करून येताना साप 'प्रतेक्ष' पाहिलेले लोक खूप असायचे.(पुलं:म्हैस!) आणि हे लोक वाट्टेल ते वर्णन करायचे: फुल फणावाला नाग आहे, दहाचा आकडापण दिसला, काळा केसवाला भुजंग आहे इ. शास्त्रोक्त किंवा मुद्देसूद वर्णन फार कमी लोक करतात आणि हे लोकच माझ्या कामाचे असायचे.

बागेमध्ये, विटांच्या ढिगाऱ्यात, बाथरूममध्ये, अडगळीच्या खोलीत, पंप हाउसमध्ये, छपरामध्ये, घुशीच्या बिळात, मोरीत, फ्रीज, टी.व्ही.खाली ( आतमध्ये सुद्धा! : आतला भाग उबदार असतो म्हणून तिकडे साप जाऊन बसतात :)), वेलीच्या जाळीत, कुत्र्याच्या घरात, ट्यूबलाईटच्या मागे, माठाच्या खाली, भाजीच्या पेटाऱ्यात, उशीच्या अभ्र्यामध्ये...अशा अनेक ठिकाणी निघालेले साप मी पकडले आहेत. योग्य त्या व्यक्तीकडून माहिती घेऊन मी साप शोधायला लागायचो. मी गेलो - साप समोर दिसला - मी पकडला, हे फार कमी वेळा व्हायचे. लोकांच्या त्रासामुळे खूप वेळा बाहेर निघालेला साप लपून बसायचा. दुसऱ्यांच्या घरात साप शोधणे ही एक कला आहे.
'होम-मिनिस्टर'मध्ये लोकांना त्यांच्या स्वतः च्या घरातला कुंकवाचा करंडा शोधणे जमत नाही, इकडे मला अनोळखी घरात साप शोधायचा असायचा.
अशा वेळी मी पहिला विचार करायचो की 'हा साप इकडे कुठून आला असेल? ज्या भागात शेवटी साप पहिला असेल, असेल त्या जागेचा अंदाज घ्यायचो; म्हणजे त्यातला पसारा, जमिनीचा प्रकार (फरशी, माती इ.), साप बाहेर पडू शकेल अशा जागा इ. आणि मग इन्कमटॅक्सवाले घर खाली करतात, तसंच पण थोडे सभ्यपणे ती जागा खाली करायला लागायचो. खरं नाही वाटणार, पण मी २-३ वेळा तळजाई वस्तीमधील काही घरे पूर्णपणे खाली केली होती. पसारा साफ करताना, लोक का एवढी अडगळ जमवतात असा प्रश्न पडायचा: फुटलेल्या कप-बश्या, मोठी फुटलेली पिंपं, मोडक्या खुर्च्या, कपाटे, वाळ्याचे तुटके पडदे, फुलदाण्या, महागडे खेळण्यांची खोकी (जी खेळणी कधी तुटतील म्हणून मुलांच्या हाती पोहोचलीच नाहीत!) आणि असंख्य कपड्यांची गाठोडी. हा अवाढव्य पसारा हलवायलापण खूप वेळा, मला कोणी मदत करायला यायचे नाही. आधी डिस्कवरी-डिस्कवरी म्हणणारे आणि मला ऑस्टिन स्टीवनचे सल्ले देणारे लोक कामाच्या वेळी गुल व्हायचे. बागेत किंवा मैदानात, घुशीच्या बिळात साप असेल तर उन्हातान्हात अंगमेहनत करून, कुदळ-फावडे घेऊन ती बिळे खोदायला लागायची. घुशीची बिळे ही एकमेकांना जोडलेली असतात, त्यामुळे एक बीळ खोदून उपयोग नसतो. कधी कधी साप (धामण) अर्धा बाहेर असेल तर तिची शेपटी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बीळ खोदायला लागायचे. पटांगणात असलेला साप लोकांनी उचकवला म्हणून खूप वेळा बिळात जाऊन बसायचा आणि मग ते १० मिनिटाचे काम लोकांच्या चुकीमुळे ३-४ तासांचे होऊन बसायचे.
मिपाकर आदूबाळ आणि अजून एक माझा मित्र (चिन्मय) यांना घेऊन मी अशीच एक अर्धी बिळात असलेली धामण पकडली होती, साधारणपणे मी कोणाला कॉलला घेऊन जात नसे; पण त्यावेळी पर्याय नव्हता. ५०-६० लोक जनता वसाहतीमध्ये (पार्वती पायथा) त्या धामणीच्या आजूबाजूला कोंडाळं करून उभे होते. मी एका हाताने धामण पकडून दुसऱ्या हाताने खोदत होतो. हे साधारण १५-२० मिनिटे चालू होते. इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली आणि कबुतरे उडून जातात, तसे माझ्या बाजूचे लोक सैरावैरा पळून गेले. असो.
बिळातला साप ओढून काढता येत नाही. स्क्रू जसा बोल्टमध्ये घट्ट बसतो, त्याप्रमाणे साप बिळात स्वतःला घट्ट (शरीराची जाडी कमी-जास्त करून ) अडकवून घेतो. त्यामुळे बाहेर येत नसेल तर परिस्थितीचा अंदाज घेऊन (मैदान, टेकडी) बिळातला साप सोडून द्यावा लागायचा.
एकदा साप दिसला की दुसरी पायरी म्हणजे तो ओळखणे. साप ओळखल्याशिवाय मी त्याला हात लावत नसे. बिनविषारी समजून विषारी साप चुकीच्या पद्धतीने पकडल्याने खूप अपघात होतात. पुण्यात चारही मुख्य (नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार) विषारी साप सापडतात. पूर्ण साप दिसत असेल तर 'दुधात साखर'; पण ती वेळ फार कमी वेळा यायची. शेपटी, डोके, डोक्याच्या भाग, पोट, पाठीवरची नक्षी किंवा त्यांचा आवाज यावरून मी हे आधी विषारी साप आहेत का बघायचो. घोणस साप प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा दीर्घ आवाज काढतो. बिनविषारी साप साधारण करून जास्त आवाज करत नाहीत.
माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. बेक्कार धुराळा उठला; त्यातच मी टारझनसारखे दोन्ही हातांनी छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकरचा आवाज येत होता, पण मला काहीच दिसत नव्हते. तेव्हा भीती वाटूनपण उपयोग नव्हता, त्यामुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिक पातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला. मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणसबरोबरचे) एकांतातील क्षण फार कमी आले. ;) असो.
विषारी सापासाठी आम्ही सर्पोद्यानची माणसे फक्त प्रश्नचिन्ह (?) सारखा आकडा तर बिनविषारीसाठी हात वापरायचो. 'डोळ्याचे पाते लवते न लवते, तोपर्यंत साप (नाग, घोरपड, उदमांजर, घार, घुबड, गरूड इ.) पिशवीत गेला पाहिजे' अशी सर्पोद्यानची शिकवण होती. ३०-४० लोक आजूबाजूला असताना ही शिकवण खूप महत्त्वाची होती; त्यामुळे अपघात व्हायचे प्रमाण खूप कमी होते आणि सापालापण त्रास कमी व्हायचा.
डिस्कवरीप्रेरित सर्पतज्ञ जागोजागी सापडायचे. त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करायचो कारण यांची फक्त तोंडाने बडबड असते, खरी भीती असायची ती तळीरामांची! रात्री तळजाई वस्ती, जनता वसाहतीत गेलो तर खूप वेळा हे तळीराम सर्पतज्ञ भेटायचे. २-४ क्वार्टर लावल्यामुळे त्यांची किंग कोब्रापण पकडायची तयारी असायची. अशा वेळी खूप शांतपणे परिस्थिती सांभाळायला लागायची. विषारी साप, नाग रात्री वस्तीच्या ठिकाणी पकडताना खूप मोठी जबाबदारी असायची. तो नाग आधीच या तळीराम लोकांनी डिवचलेला असायचा, त्यामुळे बेक्कार फूत्कार टाकत असायचा. खूप वेळा लाईट नसायची, सगळे फुल औट असायचे, बायका- पोर धिंगाणा घालत असायची. अशा वेळी या लोकांना सांभाळून, आपल्यापण जीवाची काळजी घेऊन तो नाग पकडायला लागायचा.
सर्पोद्यानचा अजून एक नियम म्हणजे: 'एकदा पिशवीमध्ये घातलेला साप, स्वतःचा बाप आला तरी त्याला दाखवायला बाहेर काढायचा नाही.' खूप वेळा नाग पकडला तर त्याच्या आध्यात्मिक महत्त्वामुळे (फुकटची अंधश्रद्धा!) लोक पूजा करायला पुढे यायचे. नागपंचमीला नागाचा कॉल केला तर अजूनच मजा. अशा वेळी मी पिशवीत टाकलेला साप-नाग कधीच बाहेर काढायचो नाही. माझ्या एका मित्राचा, असाच पूजेसाठी बाहेर काढलेला नाग परत पिशवीमध्ये घालताना अपघात झाला होता. कॉल केल्यावर खूप वेळा लोक अंगाला हात लावून बघायचे; माझ्या अंगावर कुठले आवरण आहे का, बघत असायचे. 'तुम्ही काय खाता? सापासाठी औषध कुठले घेता? तुम्हाला कुठली सिद्धी प्राप्त आहे का?', असे अनेक प्रश्न यायचे. ही उत्तरे देताना खूप काळजी घ्यावी लागायची. समाजात अंधश्रद्धा या वणव्यासारख्या पसरतात. सगळ्या लोकांना माझे एकच उत्तर असायचे: "मला साप ओळखता येतात आणि त्यांच्याविषयी माझा सखोल अभ्यास आहे, म्हणून मी त्यांना पकडू शकतो. जर अपघात झाला तर मीसुद्धा ससूनलाच जाणार आहे."
हे पकडलेले साप मी तडक सर्पोद्यानला घेऊन जायचो आणि नंतर ते निसर्गात, अभयारण्यात सोडले जायचे. कॉल येण्यापासून ते साप पकडेपर्यंत दर वेळी नवी आव्हाने असायची. ती पेलण्याची ताकद मला फक्त सर्पोद्यानने दिली. सर्पोद्यानने दिलेली जबाबदारी मी ४-५ वर्ष एकपण अपघात न होऊ देता पार पाडली आणि थोडेसे का होईना पुण्यातले साप वाचवले.
साप पकडणे हे काम सोपे नाही, जिवावरचा खेळ आहे. त्यामुळे असे लेख वाचून, डिस्कवरीवर बघून, चुकूनपण त्याच्या वाटेला जाऊ नका; त्यांच्याबरोबर फोटो काढून घेऊ नका. हे लक्षात ठेवा: "जो सापांबरोबर फोटो काढतो, तो लवकरच फोटोमध्ये जातो!"
***

***

Comments

Jabara.
Yache sarv bhag vachale ahet, specially thrilling manyaar ani ghonas vala part.
Unknown said…
Mast re Ojas... bhannat lekh

Padmakar
वा !! गारूड्याचं गारूड पूर्ण वाचल्याशिवाय उतरत नाहीये !! शेवटचा punch " जो सापांबरोबर फोटो ... " perfect जागी बसलाय !! आधीचे भाग वाचायची उत्सुकता वाढलीय !!
Unknown said…
Mastch... Inspired